राजिवली ग्रामपंचायतीचा जलसंधारणासाठी पुढाकार; रातांबी येथे लोकसहभागातून तीन बंधाऱ्यांची उभारणी

मिशन बंधारे’ उपक्रमातून पाणी अडविण्याचा संकल्प; उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न

संगमेश्वर : सचिन पाटोळे 

दि.१७: आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने ग्रुप ग्रामपंचायत राजिवलीच्या वतीने ‘मिशन बंधारे’ हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रातांबी येथे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून तीन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देत ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या कामाला चालना दिली आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजल पातळी टिकवून ठेवणे, या उद्देशाने बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी अशा उपाययोजना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

         या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रमदानातून सहभाग नोंदविला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराला लोकसहभागाची जोड मिळाल्याने तीन बंधाऱ्यांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. जलसंधारणासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न गावातील पाणी उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.या उपक्रमात सरपंच प्रगती शिर्के, ग्रामपंचायत अधिकारी सुनील जाधव, जलदूत महेंद्र कदम, कोतवाल दीपक घाडगे, गावप्रमुख सचिन पाटोळे, संजय पाटोळे आणि माजी पोलीस पाटील शांताराम पाटोळे यांच्यासह रातांबी गावातील महिला व पुरुष ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहू शकतात, हे ‘मिशन बंधारे’ उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.