इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१७ :भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींना पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून देत वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर आणि गंगामाई प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गवळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. पाहुण्यांचा परिचय सौ. ए. ए. रानडे यांनी करून दिला, तर उपमुख्याध्यापक एस. एस. कोळी यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय प्रमुख नेजे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी प्रशालेच्या समृद्ध ग्रंथालयात १० हजार ९३१ पुस्तके उपलब्ध असून, ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध वाचनविषयक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. गवळी म्हणाल्या, “प्रत्येक मुलीची पहिली गुरू तिची आई असते. संस्कारांचे पहिले धडे आई देते; मात्र त्या ज्ञानाला आकार देऊन योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करतात. आज मोबाईलच्या युगात पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. परंतु पुस्तकेच माणसाला घडवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीने पुस्तकांशी मैत्री करावी.”
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या संजय रेंदाळकर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील वाचनाचे महत्त्व उलगडून सांगितले. ते म्हणाले, “रामेश्वरममधील एका छोट्या घरातून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलेला डॉ. कलाम यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. बालपणी आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी वाचन आणि अभ्यासाची कास सोडली नाही. पुस्तके विकत घेणे शक्य नसताना ग्रंथालयात जाऊन त्यांनी ज्ञान मिळवले. वाचनातून विचार समृद्ध होतात आणि विचारांतून कृतीला दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थिनींनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून दररोज किमान ३० मिनिटे चांगल्या पुस्तकाचे वाचन करावे.”
संत साहित्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांसारख्या ग्रंथांच्या वाचनातून जीवन समृद्ध होत असल्याचे सांगितले. वाचन, विचार आणि कृती यांच्या समन्वयातूनच स्वप्ने साकार होतात, असा संदेशही त्यांनी विद्यार्थिनींना दिला. अध्यक्षीय भाषणात सौ. व्ही. एस. लोटके म्हणाल्या, “ज्ञानाची भूक कधीच संपत नाही आणि ती भागविण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे ग्रंथालय. आपल्या प्रशालेच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक विद्यार्थिनीने नियमितपणे ग्रंथालयात जाऊन वाचन केले पाहिजे. त्यामुळे ज्ञानात भर पडेल आणि स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथुन चव्हाण यांनी केले, तर पर्यवेक्षक विकास कांबळे यांनी आभार मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.