श्रीपतराव बोंद्रे दादांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन

पुतळ्यास पुष्पहार अर्पण; शहाजी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : प्रवीण भोसले 

दि.३०.: महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या परिसरातील दादांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.संस्थेचे चेअरमन मानसिंगराव बोंद्रे, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संचालक दीपक पोवार व सर्जेराव पाटील यांनी दादांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पातकर, आयटीआयचे प्राचार्य श्री. वागरे, साई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील, जवाहर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पवार, शशिकांत कसबेकर, संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी मनीष भोसले, विठ्ठल आंबले, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम, ग्रंथ प्रदर्शन, भिंतीपत्रक प्रदर्शन तसेच विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘शहाजी वार्ता’च्या २९ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘श्रीपतराव बोंद्रे दादा : समाज सुधारक राजकारणी’ या विषयावर प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी विशेष व्याख्यान दिले. त्यांनी दादांचा जीवनपट, सामाजिक व राजकीय कार्य, त्यांची जडणघडण आणि समाजाशी असलेली नाळ याबाबत मार्गदर्शन केले. दादांचे विचार प्रेरणादायी असून ते पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

           कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी केले, तर आभार डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी मानले. प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी उपस्थित होते.

                  यावेळी दादांच्या जीवनकार्यावर आधारित भिंतीपत्रक प्रदर्शन तसेच शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने संदर्भग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. स्त्री व्यक्तिमत्व विकास समितीच्या वतीने ‘ठेव गावाकडची’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शेती व शेतीपूरक उत्पादनांची विक्री करून कौशल्य विकासाचा अनुभव घेतला. या उपक्रमाचे संयोजन डॉ. सरोज पाटील यांनी केले. संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून हे विविध उपक्रम पार पडले.