संजय घोडावत शैक्षणिक संकुलात ‘संवाद यशाचा’ उपक्रम

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, करिअर व व्यक्तिमत्त्व विकासाचा मंत्र

अतिग्रे  : सलीम मुल्ला 

दि.३०: संजय घोडावत शैक्षणिक संकुल आणि व्यवसाय व उद्योग विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद यशाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यश, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर निवड आणि संकटांवर मात करण्याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. व्यवसाय व उद्योग विकास मंचाचे सचिव तथा संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रास्ताविक केले. शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील संवाद अधिक दृढ व्हावा, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व आव्हानांची माहिती मिळावी तसेच शिक्षणासोबत उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

         प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशाची संकल्पना स्पष्ट केली. “आपण स्वतः किती उंचीवर पोहोचलो याला फारशी किंमत नाही; आपण किती लोकांना त्या उंचीपर्यंत पोहोचवले, हीच खरी उंची आहे,” असे सांगत त्यांनी इतरांच्या प्रगतीत योगदान देणे हेही यशाचे महत्त्वाचे परिमाण असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी स्वतःला ‘मला आयुष्यात काय बनायचे आहे?’ हा प्रश्न विचारावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असून डॉक्टर, अभियंता, वकील, क्रिकेटपटू, अभिनेता, शास्त्रज्ञ किंवा उद्योजक होण्याचे स्वप्न पाहताना स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

           मनाची शक्ती आणि आत्मविश्वासाचे महत्त्व विशद करताना त्यांनी भगवान महावीरांच्या जीवनाचा संदर्भ दिला. “जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर,” या विचारातून त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविजयाचा संदेश दिला. बाह्य परिस्थितीपेक्षा मनातील विचार आणि आत्मविश्वास यशाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले.“आपल्या अपयशातील पहिली भीती मनातून काढून टाका. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा,” असा संदेश त्यांनी दिला. न्यूनगंड, भीती आणि अपयशाची चिंता बाजूला ठेवून ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. करिअर निवडताना इतरांचे अनुकरण न करता स्वतःची आवड, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील ध्येय यांचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

         संकटांकडे अडथळे म्हणून न पाहता ती व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मानावी. “आपल्या कमतरतांना आपली बलस्थाने बनवा,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, जिद्द आणि सकारात्मक विचारांची ताकद समजावून सांगितली. शून्यापासून सुरुवात करून मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. मोठी स्वप्ने पाहून स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या यशासोबत इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

          यावेळी व्यवसाय व उद्योग विकास मंचाचे संचालक महेश सारडा, राजेश शहा, अरुण शहा, युवराज शहा, निकुंज, अमित माटे, सचिव तथा संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्यासह शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोहन तिवडे यांनी केले, तर महेश सारडा यांनी आभार मानले. समारोपावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे आभार मानले.