इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१: दातार मळा परिसरात आक्रमक भटक्या कुत्र्याने दहशत निर्माण केली असून, गेल्या काही दिवसांपासून महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) पिठाची चक्की दळण्यासाठी जात असलेल्या एका महिला व एका पुरुषावर कुत्र्याने अचानक हल्ला करून चावा घेतला. या घटनेत दोघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सदर कुत्रा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे लागून अचानक हल्ला करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या आक्रमक कुत्र्याबाबत नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला पकडून परिसरातून नेले होते. मात्र, नागरिकांच्या आरोपानुसार, अवघ्या २४ तासांत त्याच कुत्र्याला पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, परिसरातील एका विद्यमान नगरसेवकांच्या घरातील व्यक्तींकडून या कुत्र्याला दूध व बिस्किटे दिली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. मात्र, त्याच कुत्र्याकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याने या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहत असल्याने प्रशासन आणखी किती नागरिक जखमी झाल्यानंतर जागे होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या आक्रमक कुत्र्याचा कायदेशीर व सुरक्षित पद्धतीने तातडीने बंदोबस्त करावा, जखमी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल न घेतल्यास महिला व नागरिकांची बैठक घेऊन महानगरपालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. सदर कुत्र्याला पकडण्यात प्रशासनाला यश आले असले तरी भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी व योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.