दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँकेस सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे सन्मान; २५ हजारांचे रोख बक्षीस

इचलकरंजी : विजय् मकोटे 

दि.१ : शहरातील प्रतिथयश दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँक लि., इचलकरंजीला सन २०२५-२६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर आणि अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. बँकेला स्मृतिचिन्ह, विशेष सन्मानपत्र आणि २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

          पुरस्कारासाठी बँकेची ठेव वाढ, कर्ज वाढ, ढोबळ नफा, निव्वळ नफा, भागभांडवल व गंगाजळी वाढीचे प्रमाण, प्रति कर्मचारी व्यवसायाचे प्रमाण, ढोबळ व निव्वळ एनपीए, कर्जासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर, सीआरएआर प्रमाण, ग्राहक सेवा, अंतर्गत नियंत्रण आणि मार्केटिंग कार्यपद्धती आदी विविध निकषांचा विचार करण्यात आला.

          बँकेचे ग्राहक व ठेवीदार यांनी ठेवलेला विश्वास, कर्जदार ग्राहकांनी नियमित कर्ज परतफेडीसाठी केलेले सहकार्य, संचालक मंडळाने बँकेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, कर्मचारी वर्गाने दिलेली प्रामाणिक व तत्पर ग्राहक सेवा तसेच नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे मत बँकेचे चेअरमन राजगोंडा रायगोंडा पाटील यांनी व्यक्त केले.

       पुरस्कार सोहळा बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या सभागृहात पार पडला. असोसिएशनचे अध्यक्ष निपुणरावजी कोरे आणि अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेचे अध्यक्ष महेंद्रजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी दि. इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप. बँकेचे चेअरमन राजगोंडा रायगोंडा पाटील, व्हा. चेअरमन गजानन आण्णासो लोंढे, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विलास गणपती गाताडे आणि जनरल मॅनेजर दीपक लक्ष्मण काटकर यांनी पुरस्कार स्वीकारला.

          कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे सर्व संचालक, सी.ई.ओ. सुरेश शिंदे, बँकेचे सर्व संचालक तसेच जिल्ह्यातील विविध नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.