इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ३ : आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल आवाडे युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत पोलीस भरती महाडेमो’ला हजारो युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एकत्रित मैदानी व लेखी चाचणीच्या धर्तीवर आयोजित या उपक्रमात इचलकरंजीसह कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील युवक-युवती सहभागी झाले.डीकेटीई नारायण मळा मैदानावर झालेल्या मैदानी चाचणीत अधिकृत पोलीस भरती प्रक्रियेच्या धर्तीवर १६०० मीटर, ८०० मीटर व १०० मीटर धावणे तसेच गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेण्यात आली. आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना अडचण येऊ नये, यासाठी नोंदणी व चाचणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली होती. रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या उपक्रमात शहरातील १५ विविध अकॅडमींनी सहभाग नोंदविला. मैदानी व लेखी चाचणीचे काटेकोर मूल्यमापन करून सहभागी उमेदवारांना त्यांचे गुण व गुणवत्ता यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेतील वातावरणाचा अनुभव मिळाल्याने उमेदवारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुके तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले. गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, निवृत्त अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांनी उमेदवारांना मार्गदर्शन करून चुका सुधारण्यासाठी आवश्यक टिप्स दिल्या.
आमदार राहुल आवाडे म्हणाले, तरुणांच्या भविष्यासाठी योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ग्रामीण व शहरी भागातील होतकरू उमेदवारांना प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेचा अनुभव मिळावा आणि परीक्षेची योग्य तयारी करता यावी, हा या महाडेमोचा उद्देश आहे. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सराव चाचणीत करण्यात आला आहे. यापुढे हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी मौश्मी आवाडे, राहुल आवाडे युवा सेनेचे अध्यक्ष तात्या कुंभोजे, संभाजी बंडगर, संदीप राणे, अतिश शिंदे, पवन कांबळे, राम शिंगे, शुभम जाधव, विनोद वाघमारे, अक्षय आळंदे, लहू पुजारी, इरान शेख, अंकुश पुजारी, अमित केसरकर, प्रियजित बागडे, राजू शेख, योगेश परीट, अजय शिंदे, अब्दुल शिरगावे, श्रेणिक मगदूम, सतीश मुळीक, राजू बोंद्रे, नितेश पोवार, सुशांत कलागते, राजू पुजारी, राहुल घाट, अविनाश कांबळे, बाळासाहेब कलागते, अनिकेत पाटील, सागर कम्मे, राजेंद्र बचाटे, नागेश पाटील यांच्यासह विविध अकॅडमींचे प्रतिनिधी उपस्थित होते.