खेड: सचिन पाटोळे
दि. १ : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड (ग्रामीण), कुणबी युवा व कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघाच्या १०६व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी आमदार व शिक्षणमहर्षी स्व. तु. बा. कदम यांच्या १६व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पिरलोटे येथील ह.भ.प. श्री. सरखाराम महाराज गोवळकर यांच्या संतकृपा संकुलातील बँक्वेट हॉलमध्ये गुरुवारी (१ ऑक्टोबर) हा सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमास जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेडचे अध्यक्ष शंकर बाईत, खेड ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, कुणबी युवा अध्यक्ष सुरज जोगळे, जि. प. सदस्य सचिन धाडवे, जि. प. सदस्य मानसी जगदाळे, ग्रामीण महिला खजिनदार साक्षी म्हादे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक अमर राऊत यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणबी समाजाच्या जडणघडणीत तसेच सामाजिक प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बाबाजी झुजम (कुरवल, खेड) यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रासाठी विजय घाणेकर (चिंचघर), वैद्यकीय क्षेत्रासाठी सागर जोगळे (भडगाव), उद्योगासाठी अनिल काटकर (सुकदर), उद्योग क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी अंकिता शिगवण (शेरवल), शिक्षणासाठी राजेश भागणे (तळघर), शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी रसिका रेवाळे-खांडेकर, कला व सांस्कृतिक क्षेत्रासाठी योगेश मुकनाक (तिसे), याच क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी सूर्यकांत धाडवे (कळंबणी बु.), राजकीय क्षेत्रासाठी सचिन धाडवे (सुकीवली), राजकीय क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी प्रशांत चव्हाण (भरणे), क्रीडा क्षेत्रासाठी सुप्रिया थोरे, आध्यात्मिक क्षेत्रासाठी राजाराम घाणेकर व सखाराम गोवळकर, प्रशासकीय क्षेत्रासाठी विजय बाईत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक प्रबोधन क्षेत्रासाठी संदीप गोवळकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना अस्मिताताई केंद्रे म्हणाल्या की, महाराष्ट्राचा खरा पोशिंदा कुणबी समाजातील शेतकरी बांधव आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खेड येथे भव्य कुणबी भवन उभारणे ही काळाची गरज असून, हे भवन साकारण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते आणि त्यातून समाजाची प्रगती साधली जाते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ७ जुलै २०२६ रोजी झालेल्या कुणबी परिषदेतील ठरावांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. परिषदेतील निर्णयांची अंमलबजावणी तालुक्यातील प्रत्येक गाव आणि कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन गोवळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन बाळू सनगरे यांनी केले.