इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२ : सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा समारोप स्वच्छता शपथ ग्रहण कार्यक्रमाने करण्यात आला. महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत स्वच्छतेचा संकल्प केला.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यास प्रोत्साहन देणे तसेच स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले.
अभियानाच्या समारोपप्रसंगी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, समाजकल्याण सभापती रुबन आवळे, उपायुक्त नंदू परळकर व उपायुक्त विद्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास तसेच महानगरपालिका सभागृहातील लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे तसेच दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याची शपथ घेतली. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी सहायक आयुक्त नितीन बनगे, सहायक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक संग्राम मोरे, स्वच्छता निरीक्षक उमेश कांबळे, करण लाखे, संदीप मधाळे, बबन कांबळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.