संगमेश्वर :सचिन पाटोळे
दि.५: प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने ५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर केले.ग्रामरोजगार सहाय्यक गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित विविध कामांची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, मानधनासह विविध मागण्या प्रलंबित असल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शासन निर्णयानुसार मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, मानधनाची रक्कम थेट संबंधितांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करावी तसेच सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांना विमा कवच उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांची तातडीने दखल घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी ५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. संगमेश्वर तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.