कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१० : उद्योजकीय क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी शिस्त, वक्तशीरपणा आणि कठोर परिश्रम ही मूल्ये जीवनात रुजवणे आवश्यक आहे. आधुनिक कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्याचा भक्कम पाया तयार करावा, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे सल्लागार आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथील प्रोफेसर एमेरिटस प्रा. (डॉ.) सचिन एस. वेर्णेकर यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी बी.कॉम., बीबीए आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. वेर्णेकर यांनी जनरेशन-झेडमधील तरुणांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्याच्या घसरत्या स्तराबद्दल चिंता व्यक्त केली. स्पर्धात्मक युगात करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेत व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्रेसिडेंट संजय घोडावत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विद्याशाखेचे संचालक प्रा. (डॉ.) ए. एम. गुरव यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना माणकर यांनी केले.