यड्राव : प्रतिनिधी
दि:र९ डिंसेबर गावागावात सांडपाण्याचा प्रश्न, वीज वापराची समस्या, नगरीकांचे डिजिटल अज्ञान अशा अनेक समस्या आहेत. त्याचे सर्वेक्षण करुन त्यावरील उपाय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काम करावे. शिबिराचे फलित म्हणून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या दरडोई उत्पन्नात भर पडेल असे भरीव काम करण्याची अपेक्षा शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी व्यक्त केली. ते निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व निमशिरगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या एन.एस.एस.च्या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उदघाटन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अश्विनी गुरव होत्या.
श्री. बागणे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी गावातील घरांतील एनर्जी ऑडिट करावे. त्यानंतर वीज बचतीचे उपाय सांगावेत. तसेच मॅजिक पिट व स्मार्ट व्हिलेजसाठी विद्यार्थ्यांनी प्रबोधन करावे. मॅजिक पिटसाठी शरद इन्स्टिट्युट आर्थिक सहकार्य करेल. तसेच वृक्षारोपनासाठी 500 झाडे व इतर मदत करेल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए. खोत यांनी श्रमापेक्षा बौध्दिक संस्कार होणे आवश्यक असल्याचे सांगून सर्वेक्षण व त्या डेटाचा गावच्या उन्नतीसाठी उपयोग कसा करावयाचे हे सांगितले. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सात दिवस चालणा-या ह्या शिबिरामध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सात दिवसात गावात श्रमदान, वृक्षसंवर्धन, पथनाट्य, प्रभात फेरी, विविध समस्यांचे सर्वेक्षण आदी कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी उपसरपंच ईश्वरा धनवडे, पद्माकर पाटील, अविनाश पाटील, कलगोंडा पाटील, शितल पाटील, सुदर्शन पाटील, देवाप्पा गावडे, शैलेंद्र गुरव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते. स्वागत शिबिर संचालक व्ही.एस. वाडकर यांनी केले. सूत्रसंचालन साहिल साळुंखे व आदिती चिप्परगे यांनी केले. आभार ऋतुजा कांबळे यांनी मानले.