इचलकरंजी –विजय मकोटे
दि: ३१ डिसेंबर शिवसेनेने निवडणूक लावून मला सभासद मतदारांना भेटण्याची संधी दिली आहे. तर त्यांच्या पॅनेलमध्ये तीन उमेदवार हे शिवसेनेचे असून अन्य 6 उमेदवार हे इतर पक्षांचे आहेत. शिवाय आमचे 6 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, 6 निवडून येणार आहेत त्यामुळे बँकेत आमचीच सत्ता असणार हे माहिती असतानाही विरोधकांनी निवडणूक लावून काय साधले? असा सवाल करत ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शेतकर्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेकडून नियमित कर्ज भरणार्या कर्जदाराला 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासह पिक कर्जाची मर्यादा वाढविली जाणार असल्याचे सांगितले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2021-2026 या पंचवार्षिक निवडणूकीसाठी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ कोरोची येथील रघु-जानकी सांस्कृतिक कार्यालयात संपन्न हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नामदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी, प्रचंड आर्थिक अडचण निर्माण झाल्याने जिल्हा बँक यातून बाहेर पडेल की नाही असेच वाटत होते. पण बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सर्व संकटांवर मात करत यशाची घोडदौड सुरू केली. आणि तो यशाचा आलेख चढताच आहे. बँकेची हे यश कायम राहण्यासाठी पॅनेलला विजयी करावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर मी यापूर्वीही शिवसेनेवर टीका केलेले नाही आणि करणारही नाही. मात्र शेतकरी मालक असलेली ही संस्था टिकणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
आमदार विनय कोरे यांनी, निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरले आणि दुर्दैवाने बँकेची निवडणूक लागली. शेतकर्यांचे हित जोपसणारी जिल्हा बॅक असल्याने गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून ही आघाडी अस्तिवात आली. ही बँक देशातील अग्रणी बँक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी मतदारांनी उच्चांकी मतदान करुन या प्रयत्नांना बळ द्यावे, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार अमल महाडीक, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, भगवान जाधव, बी. के. चव्हाण, प्रदीप तोडकर आदींची भाषणे झाली. मेळाव्यात अशोकराव माने, पी.एम पाटील, विश्वास पाटील, प्रकाशराव सातपूते, मदन कारंडे, प्रसाद खोबरे, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, मोहनलाल माळी, महेश पाटील, नगरसेवक नितीन जांभळे, रविंद्र माने, अरुण पाटील, डी. बी पिष्टेे, दिलीप पाटील, गिरीष इंगवले, संभाजी पवार, शहाजी पाटील, सर्जेराव माने, उदयसिंग पाटील, बाबासो चौगुले, भाऊसो आवळे, विजयमाला पाटील, विलास खानविलकर, विलास गाताडे आदींसह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. आभार झाकीर भालदार यानी मानले.