रत्नागिरी: अस्लम खान
दि. 31 जानेवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली आणि येथील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चिपी च्या विमानतळाप्रमाणेच या विमानतळावर देखील 72 सिटरचे विमान सुरक्षितरित्या उतरु शकतो अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिल्याचे ते म्हणाले. सद्या हे विमानतळ कोस्टगार्ड रन करीत असल्याने या विमानतळाला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात नाईट लँडीगची सुविधा देखील येथे उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. डोमेस्टीक विमानतळ कधी व कसे सुरु करायचे याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच रत्नागिरीकरांचे विमानामध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एअर स्ट्रिपचे काम पूर्ण झाले असून कंपाऊंड वॉलचे काम पूर्ण होत आहे. पंरतु सुरक्षिततेच्या दृष्टीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल असे ते यावेळी म्हणाले.
त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे सुरू असलेल्या तारांगणाच्या कामाची पाहणी केली. मिनी तारांगण येत्या दोन-तीन महिन्यात सुरू होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.