इचलकरंजी विजय मकोटेे
२८ जानेवारी ः भारत सरकारने नुकतेच देशातील दर्जेदार उच्च शिक्षण संस्थाच्या जाहीर केलेल्या अटल-२०२१ शैक्षणिक मानांकनाच्या यादीत डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयास देशपातळीवर ‘एक्सलंट‘ असे मानांकन प्राप्त झाले आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘अटल रँकींग ऑफ इन्स्टीटयूटशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस‘ पुरस्कार वितरण समारंभामध्ये डॉ सुभाष सरकार, भारत सरकारचे शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते मानांकन यादीची ऑनलाईन घोषणा करण्यात आली.
देशामध्ये डीकेटीईचे टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, अटल रॅकींग सर्वेक्षणामध्ये ‘एक्सलंट बँड‘ मध्ये गौरविले गेले हे संस्थेसाठी भुषणावह आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात आज नाविण्यपूर्ण संशोधनाला मोठे महत्व आहे. देशभरातील सर्व राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थानी या मानांकनामध्ये सहभाग घेतला होता, यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने अर्ज मागितले होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून, कोल्हापूर जिल्हयातील डीकेटीई या एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘एक्सलंट बँड‘ यादीत समावेश झाला आहे. अटल रँकीग मानांकनाला भारताच्या सर्व प्रमुख शैक्षणिक व व्यावसायिक गटांमध्ये व्यापक मान्यता मिळाली आहे. देशामध्ये उच्च गुणवत्तेच्या संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता निर्माण करण्यसाठी ही मानांकन यादी उपयोगी ठरणार आहे.
यामध्ये नवकल्पनानिर्मिती, अर्थसंकल्प व निधी, नाविण्यपूर्ण शिक्षण पध्दती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजगता जागृती व त्यासाठी लागणा-या पायाभूत सोयी सुविधा,नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि स्टार्टअप साठी शिक्षण संस्थेमार्फत पुरविण्यात येणारे प्रोत्साहन,तसेच इन्क्युब्युशन आणि उद्योजकांची भागिदारी अशाविविध निकषांचा काटेकोरपणे विचार केला जातो.
या सर्व बाबींची सर्वांगाने सखोल पडताळणी केल्यानंतर सहभागी झालेल्या कॉलेजीसमधून डीकेटीईला हे मानांकन जाहिर झाले आहे. याआधीही डीकेटीईस अटल रँकीगमध्ये देशपातळीवर ३३ व्या मानांकनाने सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच बेस्ट इंजिनिअरींग कॉलेज म्हणून सुध्दा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. डीकेटीईमध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर, पीएचडी असे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डीकेटीईमध्ये संशोधनासाठी भारत सरकार कडून प्राप्त आयडिया लॅब, तसेच अनेक आंतराराष्ट्रीय सुसज्ज लॅब आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
या मानांकनासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, खजीनदार आर.व्ही.केतकर, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिटयूटचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, डॉ सौ. एल.एस.आडमुठे, डीन डॉ आर.एन.पाटील, सर्व विभागप्रमुख ,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.