इचलकरंजी. विजय मकोटे
दि . ३१ जानेवारी इचलकरंजी नगरपरिषद हद्दीतील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या उर्दू शाळेतील वर्गवाढ संदर्भातील प्रस्ताव तयार करुन ते तातडीने शासनाकडे सादर करावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र चिटणीस समीर जमादार व माजी सरचिटणीस हातकणंगले तालुका युवक काँग्रेस ताजुद्दीन खतीब यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात, अल्पसंख्यांक समाजात शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. ते रोखण्यासाठी अल्पसंख्यांक समिती सदस्यांच्या सुचनेनुसार ज्याठिकाणी सातवीपर्यंत शाळा आहेत त्या शिक्षण संस्थेत 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग वाढविण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. त्यानुसार ज्याठिकाणी तातडीने मंजूरी देणे शक्य आहे अशा शाळातील वर्गवाढीस तातडीने मंजूरी देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजी नगरपरिषद हद्दीतील आठ उर्दू शाळांचा सर्व्हे करुन आवश्यक त्या ठिकाणी 8 वी ते 12 वी पर्यंत वर्गवाढीचे प्रस्ताव तयार करुन ते तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्यात यावेत, असे नमुद केले आहे. इचलकरंजी नगरपरिषद हद्दीत 8 शाळा असून त्यामध्ये 1198 विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित 58 शाळा असून पहिली ते आठवीपर्यंत 4348 विद्यार्थी-विद्यार्थीनी शिकत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात प्रशांत लोले, आलम मोमीन, नासीर गवंडी, अस्लम खलिफा, दस्तगीर बाणदार, लखन सुतार आदींचा समावेश होता.