इचलकरंजी :प्रतिनिधी
दि ५ मार्च :हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावातील पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. 1 कोटी 99 लाख 994 रुपये खर्चाच्या या योजनेसाठी आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली आहे.
प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा गाभा आहे. या योजनेमुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कोरोची या गावाला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी गावातील महिला आणि लहान मुलांची वणवण थांबणार आहे. कोरोची गावात ही योजना व्हावी यासाठी शासन दरबारी आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. कोरोची गावासाठी 1 कोटी 99 लाख 994 रुपयांची ही योजना आहे. या योजना कामाची निविदा प्रसिध्द झाली असून लवकरात लवकर ही योजना पूर्ण होऊन कोरोची गावचा पाणी प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.