इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ८ मार्च :महावितरण कंपनीने अचानकपणे वस्त्रोद्योगातील सर्व घटकांची वीज सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. या निर्णयामुळे हा उद्योग बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करुन वीज सवलत पुर्ववत सुरु करावी यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड टेक्स्टाईल पार्कमधील (केएटीपी) उद्योजकांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे मागणी केली आहे. आमदार आवाडे यांनी वीज सवलत पूर्ववत सुरु होण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करु अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली आहे.
आधीच विविध संकटांचा सामना करावा लागत असताना महावितरण कंपनीने वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांची वीज सवलत रद्द करण्याचा फतवा काढल्याने सर्वच उद्योजक हवालदिल झाले आहेत. या प्रश्नी केएटीपी मधील सर्वच उद्योजकांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली.
राज्य शासनाकडून प्रदीर्घकाळापासून वीज सवलत दिली जात आहे. मध्यंतरी ऑनलाईन नोंदणीत तांत्रिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाल्याने राज्य शासनाने 27 अश्वशक्तीवरील नोंदणी न केलेल्या सर्वांची वीज सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या प्रश्नी केलेल्या पाठपुराव्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी वीज सवलत पूर्ववत सुरु करण्याचे जाहीर केले होते. मात्र महावितरण कंपनीने अचानकपणे वीज सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने वीज बिले दुप्पट दराने येणार आहेत. मागील काही वर्षापासून विविध कारणांनी वस्त्रोद्योगासह सर्वच उद्योग आर्थि अरिष्टात सापडले आहेत. त्यामध्ये वीज सवलत रद्द केल्याने भर पडणार असून वाढीव दराने वीज बिले भरणे अशक्यप्राय असून संपूर्ण वस्त्रोद्योग कोलमडून जाईल आणि कायमस्वरुपी ठप्प होईल अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली.
या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी तसेच संबंधित मंत्रीमहोदय व विभागाकडे आपण पाठपुराव करुन रद्द केलेली वीज सवलत पुर्ववत सुरु करावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी केएटीपी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे, व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर आदींसह उद्योजक उपस्थित होते.