कोल्हापूर: सलीम मुल्ला
दि. ६ जुलै २०२६ : जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (गुटखा) निर्मितीच्या कारखान्यावर शहापूर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २२ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ६ जुलै रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.५० या वेळेत हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील गट क्रमांक १३ मधील गोदामावर छापा टाकण्यात आला. छाप्यात गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे साहित्य, रसायने आणि मशिनरी आढळून आली.कारवाईदरम्यान सुगंधित तंबाखू, कच्ची तंबाखू, मेंथॉल क्रिस्टल्स, मसाला पावडर, लिक्विड पॅराफिन, लिक्विड ग्लिसरीन, फ्लेवरिंग लिक्विड, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मिक्सर, स्टील भांडी, हँडहेल्ड इंकजेट प्रिंटर, कंटिन्युअस बँड सीलर तसेच शिवण मशीन असा एकूण २०,२२,६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या आरोग्यास घातक सुगंधित तंबाखूचे उत्पादन व साठवणूक करून विक्रीसाठी तयारी करत असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत विनायक आनंद मुणगणे (रा. शाहूपूर), पुनाराम सोमलाल नाईक (मूळ रा. राजस्थान), अविनाश राजेंद्र कोळेकर (रा. इचलकरंजी), गोपाल राम अर्जुनराम नाईक आणि राजूराम भियाराम नाईक (दोघेही मूळ रा. राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेन्द्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे व शहापूर पोलीस पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करीत आहेत