कबनूर: हबीब शेखदर्जी
दि. ९ : रौप्य महोत्सवी इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या चेअरमन सौ. संगिता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कबनूर येथील मामा लिगाडे सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेच्या प्रारंभी संस्थेच्या मॅनेजर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मॅनेजर सौ. वेदिका देशपांडे यांनी सभेची नोटीस वाचन करून विषयपत्रिकेवरील कामकाजास सुरुवात केली.
संस्थेच्या चेअरमन सौ. संगिता पाटील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल तसेच ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. संस्थेने आर्थिक वर्षात ६ लाख ३५ हजार ५६६ रुपयांचा निव्वळ नफा मिळविल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या हिताचा विचार करून यावर्षीही १० टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी कबनूरचे माजी सरपंच मधुकर देवाच्या मणेरे यांची कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. स्वाती कोले यांच्या हस्ते श्री शांतिनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, वसंतदादा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव बडवे तसेच व्हा. चेअरमन संजय केटकाळे यांचा सत्कार करण्यात आला.
सभेस संस्थेच्या संचालिका सौ. विजया मणेरे, सौ. मंगल काडाप्पा, सौ. संगिता चव्हाण, सौ. मीता पाटील, सौ. अनिता कोले यांच्यासह संस्थेचे मॅनेजर, अधिकारी, क्लार्क सौ. रेखा हेरवाडे, दिलीप आवळे तसेच सभासद व मान्यवर उपस्थित होते. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.