स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला पॉवरलूम असोसिएशनचा विरोध

दडपशाहीने मीटर बदलण्याचा आरोप; महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन

इचलकरंजी : विजय मकोटे

दि .९ : स्मार्ट मीटरमुळे एम.डी. (मागणी) वाढून वीज बिले तिप्पट ते चौपट येत असल्याचा आरोप करत दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बदलण्याच्या मोहिमेला तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्योजकांवर दबाव आणून अथवा दडपशाहीने मीटर बदलण्याची पद्धत तात्काळ बंद करावी, अशी मागणी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केली.या संदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, अधीक्षक अभियंता जी.एम. लटपटे यांची भेट घेऊन ९ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन दिले. यावेळी इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदील उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी व परिसरात महावितरणकडून वीज मीटर बदलण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, मीटर बदलण्यास विरोध करणाऱ्या उद्योजकांवर दबाव आणला जात असून, काही ठिकाणी दादागिरीची भाषा, वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी तसेच भीती दाखवून मीटर बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप असोसिएशनने निवेदनातून केला आहे.काही ठिकाणी कनिष्ठ अधिकारी व वायरमन यांनी संपूर्ण भागाचा सिंगल फेज अथवा वीजपुरवठा बंद करून मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्याने उद्योजक व महावितरण कर्मचारी यांच्यात वादावादीचे प्रकार घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारातून अनुचित घटना घडल्यास त्यास महावितरण कंपनी व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
वीज जोडणीमध्ये फॉल्ट अथवा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी मीटर बदलणे बंधनकारक असल्याचे सांगणे, तसेच मीटर न बदलल्यास मीटरचे रीडिंग घेतले जाणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. त्यामुळे औद्योगिक शहरातील वातावरण बिघडत असून, ठिकठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.मीटर बदलण्यासाठी येणारे कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव असल्याचे तसेच मीटर न बदलल्यास निलंबित करण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगत असल्याचा दावाही असोसिएशनने केला आहे. काही ठिकाणी डांबांवर मीटर बसविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
                                              जुन्या मीटरच्या रीडिंगनुसारच वीज बिले भरण्याचा इशारा
उद्योगाच्या ठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या वीज मीटरनुसार येणारी वीज बिलेच यापुढे भरली जातील. अन्यथा वीज बिल भरले जाणार नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची राहील, असा स्पष्ट इशारा असोसिएशनने दिला आहे. जबरदस्तीने मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.या शिष्टमंडळात दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, राजगोंडा पाटील व प्रकाश गौड यांचा समावेश होता.