गणेशोत्सवासाठी रत्नागिरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई-गोवा महामार्गावर १४ फिक्स पॉईंट; ५९ अॅम्ब्युलन्स, ३३ क्रेन सज्ज

रत्नागिरी :नियाझ खान 

दि.१०: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांनी दि. ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन गणेशोत्सव बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था तसेच प्रमुख गणेश विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली.

             रत्नागिरी जिल्ह्यात यंदा १२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तसेच १ लाख ६९ हजार ५३८ खाजगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रकिनारे, खाड्या, नद्या आणि तलाव आदी ठिकाणी होणार असल्याने सर्व विसर्जनस्थळांवर आवश्यक सुरक्षा आणि पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ५८ पोलीस अधिकारी आणि ६५० पोलीस अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व आवश्यक साधनसामग्रीने सज्ज असलेली आरसीपीची दोन आणि क्यूआरटीची दोन पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार असून, अतिरिक्त ५०० होमगार्ड, २० पोलीस अधिकारी आणि १०० पोलीस अंमलदारांची मागणी करण्यात आली आहे.

         गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गणेश विसर्जनस्थळांची सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सव काळातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन १४ ठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. या सर्व महत्त्वाच्या बंदोबस्त पॉईंटची विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक नियोजन, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि उपलब्ध मनुष्यबळाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

         गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या संख्येने ये-जा करणाऱ्या चाकरमानी आणि गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी ५९ अॅम्ब्युलन्स आणि ३३ क्रेन उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत.महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे, अंडरपास, वॉटलनेक पॉईंट आणि लँडस्पॉटसह खेड-जगबुडी पूल, चिपळूण-वाशिष्ठी नदी पूल, संगमेश्वर-शास्त्री पूल, लांजा-अंजणारी पूल आणि वेरळ घाट यांचाही विशेष आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, विसर्जन मिरवणुका सुरक्षितपणे पार पडाव्यात आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी सतर्कता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

         या पाहणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्यासमवेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.), पोलीस उपअधीक्षक आतांरक्षा यादव (भा.पो.से.), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.