शिरोळ (प्रतिनिधी) :
दि. १० मार्च क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झाली आहे. औरवाड येथील शेतकरी एकत्र येऊन नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी या आधीही पुढे आले असून पुन्हा उर्वरित क्षेत्रामध्ये क्षारपड मुक्त प्रकल्पाचे शुभारंभ आज पार पडले. शेतकरी स्वतःहून या प्रकल्पामध्ये भाग घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूह लागेल ती मदत करेल, अशी ग्वाही श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
औरवाडचे सरपंच अशरफ पटेल म्हणाले, जमीन क्षारपड झाल्यामुळे एका पिढीला त्याचा त्रास सहन करावा लागला. जर या जमिनी सुधारल्या तर आमच्या पुढील पिढ्या समाधानाने जगू शकतील ही दृष्टी घेऊन शेतकरी एकत्र येऊन क्षारमुक्तीचे काम करीत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. या कामाला दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी संपूर्ण पाठबळ दिले आहे, त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. एक अप्रतिम असे काम दादांच्या माध्यमातून होत असल्याचे पाहून आनंद वाटतो.
गणपतराव पाटील यांच्या क्षारमुक्तीच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर ‘दत्त पॅटर्न’ म्हणून घेतली गेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चितच यशस्वी झाला आहे. या प्रकल्पामध्ये कोणताही संकोच मनात न बाळगता शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. येणारा काळ शेतकऱ्यांना समृद्धी देणारी असेल असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी या शुभारंभस बुबनाळचे ग्रा.प. सदस्य सुभाष शहापुरे, मा. सभापती कमरूद्दीन पटेल, मा. सरपंच कल्लू माने, मा. तंटामुक्त अध्यक्ष साहेबपाशा पटेल, नियाज पटेल, अस्मत पटेल, रशीद पटेल, जयवंत कोले, मुस्ताक पटेल, शानवाज पटेल, युनूस पटेल, इरफान चौगुले, मल्लाप्पा ऐनापुरे यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.