रत्नागिरी :-
रत्नागिरीच्या वैभवात भर घालणाऱ्या रत्नदुर्ग किल्ल्याचा मुख्य दरवाजा झाडांच्या विळख्यात सापडला असून,त्या परिसराची स्वच्छता होणे गरजेची होती.या झाडाझुडपांमुळे या दरवाजास धोका निर्माण झाला होता.त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती आयोजित आणि गडकिल्ले अभ्यासक महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली,सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय श्रमदान स्वच्छता मोहिम रत्नदुर्ग येथे पार पाडली.यावेळी मुख्य प्रवेशद्वार परिसर व तटबंदीवर उगवलेली झाडे-झुडपे तोडून स्वच्छता करण्यात आली.यामुळे येथील अवशेषांनी मोकळा श्वास घेतला. परंतु संवर्धन करतेवेळी इथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे.छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी घाम गाळून उभारलेले आणि रक्त सांडून टिकवलेले हे पवित्र किल्ले,आज व्यसनी लोकांचा अड्डा बनत आहेत.याला वेळीच आळा घातला पाहिजे.याकरिता शासन व स्थानिक लोक यांच्या सहकार्यातून ठोस उपाय करणे गरजेचे आहे.
रत्नदुर्ग येथे झालेल्या श्रमदानास शहरातील सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती,शिवप्रतिष्ठान,सह्याद्री प्रतिष्ठाण,हनुमान मंडळ किल्ला या दुर्गप्रेमी संस्था,तसेच प्रसाद घोडगे,राकेश नलावडे,नंदू उर्फ बंटी साळवी,अॕड.अमित काटे,नितीन भोंडवे,गोवर्धन राठोड,सागर मोहित,प्रफुल्ल कदम,अनिकेत सुर्वे,प्रसन्न यादव,यश डोंगरे,सौरभ सुर्वे इत्यादी शिवप्रेमी तरूण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.श्रमदान मोहिमेसाठी व्यावसायिक गणेश धुरी यांनी सहकार्य केले.समिती मार्फत येत्या काही दिवसात रत्नदुर्ग किल्ल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने स्थलदर्शक नकाशा,संक्षिप्त इतिहास व मार्गदर्शक फलक लावण्याचे नियोजित आहे.