परळी वैजनाथ: प्रतिनिधी
दि.१४: “आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल,” असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
परळीतील अंबेजोगाई रस्ता लगत असलेल्या ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, खासगी सचिव मंदार वैद्य, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त, बहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते.