हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेला निर्णय दिशादर्शक

उद्यान पंडित गणपतराव पाटील

शिरोळ: विजय धंगेकर

दि.१२ मे : छत्रपती राजर्षि शाहूंची स्मृतीशताब्दी होत असतानाच राजर्षिचा पुरोगामी वारसा पुढे नेत हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याबाबत हेरवाड ग्रामपंचायत महिला सदस्यांचे दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. विधवा महिलांना समाजात आपुलकीची वागणूक आणि सन्मान मिळाला पाहिजे याकरीता हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे हे अतिशय अभिमानास्पद तसेच महिला उत्कर्षासाठी क्रांतिकारी आणि पुरोगामी विचाराला बळकटी देणारा असल्याचे गणपतराव पाटील म्हणाले.

हेरवाड ग्रामपंचायतीच्या सदस्या मुक्ता संजय पुजारी व सुजाता केशव गुरव यांनी विधवा महिलांना समान वागणूक आणि इतर महिलांप्रमाणे सन्मान करण्यात यावा यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती सुरु केली. पुरुषांच्या बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या स्त्रीला अशी वागणूक का? हा प्रश्न आहे. त्यामुळेच हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण ठराव करण्यात आल्याची माहिती दिली. हेरवाड ग्रामपंचायतीने केलेला ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिशादर्शक ठरणार आहे. विधवा महिला सन्मान व संरक्षण कायद्याला या निमित्ताने बळकटी मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी दत्तचे संचालक प्रमोद पाटील, विजय सुर्यवंशी, बसगोंडा पाटील, विश्वनाथ माने, हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सुकुमार पाटील, ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार-गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.