जयसिंगपूर : प्रतिनिधी
दि ,२ जानेवारी: भारताच्या शाश्वत विकासासाठी सध्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्माण व साठवण, बॅटरी, सुपरकॅपॅसिटर, गॅस सेंसिंग अशा सर्वच क्षेत्रात प्रभावी नॅनो पदार्थांचा वापर करून वैज्ञानिकांनी नॅनोक्रांती घडवून आणली आहे, असे प्रतिपादन सी-मेट, पुणे चे संचालक डॉ.भरत काळे यांनी केले. घोडावत विद्यापीठ आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी घोडावत विद्यापीठ व` सी-मेट, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. तसेच विद्यापीठाने सुरु केलेल्या ‘सेंटर फॉर रिनीवेबल एनर्जी अँड ऍडव्हान्स मटेरियल’ (क्रीम) या संशोधन केंद्राचे उदघाटन डॉ.भरत काळे आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
समन्वयक डॉ.संभाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. तर कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व त्यांना सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी लागणारी सर्व जीवनकौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले व विद्यापीठाचा प्रगतीचा आलेख विशद केला.यावेळी विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व यापुढे अशा उपक्रमांना विद्यापीठाकडून लागेल ती मदत पुरवू असे आश्वासन दिले.
या चर्चासत्रात सी-मेट चे संचालक डॉ. भरत काळे, क्वीनसलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियाचे संशोधक प्रा.दीपक डूबल, युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स ऑस्ट्रेलियाचे डॉ.महेश सूर्यवंशी, डोंगूक युनिव्हर्सिटी साउथ कोरियाचे डॉ. चिन्ना डी.बाथूला यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रासाठी ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला.
हे चर्चासत्र यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी असोसिएट डीन डॉ.संभाजी पवार, डॉ. पल्लवी भांगे व डॉ.सरिता पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव, रिसर्च डीन डॉ.आनंद सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.