श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये वार्षिक हस्तलिखित अंकांचे प्रकाशन

इचलकरंजी:विजय मकोटे

दि.१:” मातृभाषा हे शिक्षणाचे मूलभूत माध्यम आहे. आपल्या मनातील विचार गद्य अथवा पद्य स्वरूपात आपण व्यक्त करायचे असेल तर मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. हस्तलिखित निर्मितीत सहभाग घेतल्यास आपोआपच आपल्या अंगातील अनेक कलागुणांच्या विकासाला संधी मिळते.. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सर्वच शिक्षक आणि विद्यार्थिनींनी यावर्षीच्या हस्तलिखित निर्मितीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यामुळेच प्रत्येक वर्गातून एक दर्जेदार अंक निर्माण झालेला आहे .” असे प्रतिपादन श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर यांनी केले. येथे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत वार्षिक हस्तलिखित प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ एस एस भस्मे या होत्या.
या कार्यक्रमात प्रारंभी प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री व्ही एन कांबळे यांनी सर्वांचे कार्यक्रमांमध्ये स्वागत करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक वर्गातून एक हस्तलिखित अंक निर्माण करत असताना सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी उत्साहाने केलेल्या कामाचा व त्याचे फलित म्हणून इतके सुंदर हस्तलिखित अंक तयार झाल्याचा गौरवाने उल्लेख केला. या कार्यक्रमासाठी प्रशालाचे उपप्राचार्य श्री आर एस पाटील , पर्यवेक्षक श्री एस व्ही पाटील विभाग प्रमुख श्री एस एस कोळी , प्रा . शेखर शहा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते . विभाग प्रमुख श्री एस एस कोळी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस पी धातुंडे यांनी केले.