चंदगड:प्रतिनिधि
दि:२७:जुन:पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याचा राग मनात धरून पोलिस पाटील यांचा गावातील चौघांनी कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर सपासप वार करून खून केला. ही घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील देवाचीरांगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१,रा. पोवाचीवाडी) असे मृत पोलिस पाटलाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप याला शनिवारी रात्री बोलावून घेतले. त्यानुसार पोलिस पाटील हे गुरव यांच्या देवाचारांगी नावाच्या शेतात गेले. दरम्यान, पोलिस पाटील हे संशयित आरोपी रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले असता जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून कोयता व खुरप्याने हातावर, डोकीत व मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदीपला लागलीच नेसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
संशयित मुख्य आरोपींपैकी रोहित स्वतःच शनिवारी रात्रीच पोलिसांना शरण आला, तर इतर तिघांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं. मयत संदीप याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर संदीपच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्च २०२३ रोजी भांडण झाले होते. यामध्ये रोहित व भावकीतील काहीजणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये मयत पोलिस पाटील संदीप यानेच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून हा खून झाल्याची फिर्याद वडील ज्ञानदेव पाटील यांनी पोलिसांत दिली आहे.
या प्रकरणात संदीपला फोन करून सुरेश गुरव यांनी बोलवून घेतले असून तेही या खूनात सामील असल्याने त्यांनाही अटक करा. मगच मृतदेह ताब्यात घेणार, अशी भूमिका पत्नी अनुराधा व पोलिस संघटनेनं घेतल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी गुरव यालाही अटक करु, असे आश्वासन दिल्यानंतर गावातील वातावरण निवळले.