शेतजमिन नावे असलेल्या मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील व्यक्तींना 20 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली:प्रतिनिधी

दि:०७:नोव्हेंबर: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत शेतीपुरक / विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याकरीता जिल्ह्यातील मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील ज्या व्यक्तींच्या नावे शेतजमिन आहे, अशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, रेल्वे क्रॉसिंग जवळ, जिल्हा कार्यालय सांगली येथे दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.

मातंग समाज व तत्सम 12 पोटजाती मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या जातीतील ज्या ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे, याबाबतचा तपशिल शासनास सादर करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे शासनाकडे महामंडळामार्फत शेतीपुरक / विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याकरीता माहितीची आवश्यकता असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.