औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही; हसन मुश्रीफांचं मुस्लिमांना आवाहन
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:१२:जून:कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाच्या विविध भागाच अजूनही बंद पाळण्यात येतोय. यावरुन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुस्लिम समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केले.
हसन मुश्रीफ म्हणाले की, गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरचं वातावरण सातत्यानं बिघडत आहे. वास्तविक मी आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीरपणानं आवाहन केलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांच्याविषयी कधीही आकस नव्हता. मुस्लिम समाजाच्या मनामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधी आकस राहिलेला नाही
तुम्ही इतिहास पाहिलेला असेल तर वास्तविक गोविंदराव पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये 22 सरदार आणि प्रमुख मग तो नौदलाचा असेल त्यांचा वकील असेल किंवा त्यांचा अंगरक्षक असेल ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी जीवाची बाजी लावून आग्र्यातून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला तो मदारी मेहतर असतील असे 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख जर महाराजांकडे असतील तर असे विश्वासू माणसं असल्याशिवाय महाराज त्यांना आपल्याजवळ कसं ठेवतील, ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती.
त्यानंतर इतके जर 22 लोक असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील, आणि मग जर इतक्या मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई जर झाली असेल तर मग औरंगजेब आपला होऊच शकत नाही, म्हणून मुस्लिम धर्मियांनी आपली जी लहान मुलं आहेत त्यांना आपला इतिहास समजावून सांगण्याची गरज असल्याचे यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.
त्याचवेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याने वातावरण बिघडले होते. त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अशा घडणाऱ्या घटनांसाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांबाबद पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप हसन मुश्रीफांनी केला आहे. हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोख्याने शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन हसन मुश्रीफांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.