आवाडे जवाहर साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार प्रदान
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२४ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे (व्हीएसआय) या संस्थेकडून गाळप हंगाम 2021-22 करीता हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि व्हीएसआयचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे, केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी व संचालकांनी स्विकारला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 46 व्या वार्षिक साधारण सभेमध्ये या पुरस्काराचे समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, व्हीएसआयचे विश्वस्त आमदार अजितदादा पवार, जयंत पाटील, संभाजी कडू-पाटील, शिवाजी देशमुख, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील, विशाल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
शेती व सहकार क्षेत्रातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ऊसाचे वाढते क्षेत्र व विक्रमी उत्पादान पाहता उत्पन्न नसलेल्या राज्यात साखर निर्यातीसाठी प्रयत्न करूया. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सहकारातील अनुभव व अभ्यास कृषि विकासाला चालना देणारा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तर व्हिएसआय चे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे. कारखान्यानी आर्थिक व्यवस्थापन सुदृढ करण्यासह पर्यावरण संवर्धन व कार्यक्षमता वाढवावी, असे आवाहन केले.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास 12.13 टक्के साखर उतारा, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये 6.74 टक्क्यांनी वाढ, रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 96.22 टक्के, साखर तयार करण्यासाठी बगॅसचा वापर फक्त 15.75 टक्के आणि रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी 87.59 टक्के या वैशिष्ट्यांमुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या नामांकित संस्थेकडून दक्षिण विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
दररोज 1016 मे.टन ऊस गाळप क्षमतेचा परवाना घेऊन घेवून प्रत्यक्षात 2500 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु केलेल्या कारखान्याकडून अत्यल्प भांडवली खर्चात विविध टप्पे पार करत सध्या दैनंदिन 16 हजार मे. टन ऊस गाळप क्षमतेसह 27 मेगॅवॅट सहवीज निर्मिती केली जात आहे. कारखान्याने सुरुवातीपासूनच तांत्रिक कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रीत करुन वाफ, वीज आणि बगॅसची बचत केल्यामुळे मशिनरींच्या कार्यक्षमतेचा पुर्णपणे वापर झालेला आहे. कारखान्यास यापुर्वी नॅशनल फेडरेशन, साखर संघ, व्हीएसआय आदी नामवंत संस्थांकडून तांत्रिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण, वीजबचत, व्यवस्थापन याबाबतचे आतापर्यंत विविध स्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, जिनगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभयकुमार काश्मिरे, दादासो सांगावे, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, सुमेरु पाटील, गौतम इंगळे, शेखर पाटील व विजय कुंभोजे आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.