भाजपची सापत्न वागणूक, गजानन कीर्तिकरांनी मनातली खदखद बोलून दाखवली

फडणवीसांचं प्रत्युत्तर

अहमदनगर: प्रतिनिधी 

दि.२७.मे.

भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे खळबळजनक वक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु झाली होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. 

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना गजानन कीर्तिकर यांनी लोकसभेच्या २२ जागांवर केलेला दावा आणि भाजपकडून होणाऱ्या दुजाभावाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, गजानन कीर्तिकर यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही. या कपोकल्पित बातम्या आहेत. आमच्यात (भाजप-शिवसेना) कोणतीही समस्या नाही. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष अत्यंत समन्वयाने काम करत आहेत. हे सगळं काम असंच पुढे सुरु राहील. आमच्यात सर्व गोष्टी ठरतील तेव्हा तुम्हाला सांगू, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गटातील चव्हाट्यावर येत असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

राम शिंदे आणि विखे-पाटलांमध्ये पॅचअप

अहमदनगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सुरु असलेला वादही देवेंद्र फडणवीस यांनी मिटवला. आजच्या पत्रकार परिषदेला बसताना देवेंद्र फडणवीस यांच्या एका बाजूला राम शिंदे आणि दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण विखे-पाटील बसले होते. यावेळी पत्रकारांनी, ‘तुमच्या शेजारी जे दोघे बसलेत त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे’, असा प्रश्न फडणवीसांना विचारला.त्यावर थोडाही वेळ न दवडता फडणवीस यांनी म्हटले की, ‘म्हणून तर मी दोघांना बरोबर घेऊन बसलोय ना. दोघांमध्ये समन्वय आहे, काही काळजी करु नका. काही वाद नाही. असं आहे की, वाद असला तरी ते वादळ नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील हा वाद संपला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.त्यांच्या या वक्तव्यावर शेजारीच बसलेले राधाकृष्ण विखे-पाटील मोकळेपणाने हसले. त्यामुळे तुर्तास तरी राम शिंदे आणि विखे-पाटील यांच्यातील वादावर पडदा पडल्याचे दिसत आहे

गजानन कीर्तिकर नेमकं काय महणाले होतो?

आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. पण भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळते, अशी माहिती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली. यावेळी गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही भाष्य केले. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही. २०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावापट झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २६ जागा लढवल्या. यापैकी २२ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील. त्यादृष्टीने आमची तयारी झाली आहे, असा दावाही गजानन कीर्तिकर यांनी केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×