चिपळूण:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चिपळूण शहरामध्ये नियमित गस्त घालत असताना चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोड स्थित माऊली अपार्टमेंट मधील फ्लॅट क्र २०२ मध्ये एक राखाडी रंगाचा चौकडा शर्ट व काळी पॅन्ट घातलेला इसम एक गावठी बनावटीचे पिस्टल व राऊंड स्वतःचे ताब्यामध्ये बाळगून आहे.
लागलीच पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे यांनी याबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांना अवगत केले व शहरामध्ये गस्तीवर असलेल्या सपोनि श्री. रत्नदिप साळोखे व अंमलदार यांना याबाबत खबर दिली व दोन पंचांसमावेत सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला
या पथकाने, छाप्या दरम्याने रेल्वे स्टेशन येथील माऊली अपार्टमेंटच्या रूम नं. २०२ चा दरवाजा ठोठावला असता, एक इसम पोलीसांना पाहताच कावरा बावरा होऊन फ्लॅट मधून पळून जाऊ लागला तेव्हा त्याला चिपळूण पोलीस पथकाने जागीच ताब्यात घेतले व त्याला नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव निरज हिरासिंग बिश्त, वय- २१ वर्षे. रा. खोलाबेडी, ता. घनसाली, जि. टिहरी, राज्य उत्तराखंड असे सांगितले.
या पथकाद्वारे सदर रूम नं. २०२ ची झडती घेतली असता निरज हिरासिंग बिश्त राहत असलेल्या बेडरूम मधील पोटमाळ्यावर पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये असलेल्या बॅग मध्ये कपड्यांच्या खाली एका कापडी पिशवीमध्ये गावठी बनावटीची लोखंडी पिस्टल गुंडाळून ठेवलेली मिळून आली तसेच या पिशवीमध्ये दोन लोखंडी मॅगजीन, ४६ राऊंड, 2 काळ्या रंगाचे फायटर पंच, दोन मोबाईल हँडसेट देखील मिळून आले आहेत.
वरील मिळून आलेला एकूण ₹ 88,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच निरज हिरासिंग बिश्त, वय- २१ वर्षे. रा. खोलाबेडी, ता. घनसाली, जि. टिहरी, राज्य उत्तराखंड यास ताब्यात घेऊन त्याच्यावर चिपळूण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 123/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह म.पो.का. कलम 37(1)(3)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यात येत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.