शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा :

आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी ,हबीब शेखदर्जी 
दि .१६ :उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीऐवजी शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण आणि ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.
मुंबईतील कृषी विवेक प्रकाशित (विवेक समूह मुंबई) व जयकिसान सहकारी सोसायटी चंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार कन्या विद्या मंदिर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते ’कोल्हापूर कृषी उद्योग विशेष’ पुरवणीचे आमदार प्रकाश आवाडे, सोलापूर येथील यशस्विनी अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा आणि प्रेरणा महिला मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते.
याप्रसंगी कृषी विवेकचे संचालक आदिनाथ पाटील,  डॉ.हेडगेवार रूग्णालयाचे  (इचलकरंजी) वैद्यकीय अधिकारी तथा रा. स्व. संघाचे कोल्हापूर जिल्हा सहकार्यवाह डॉ. राजेश पवार, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगोंडा पाटील, हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, चंदूरच्या सरपंच स्नेहल कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बसवराज पाटील, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष जवाहर छाबडा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार आवाडे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’विकसित भारत व आत्मनिर्भर भारत’ची संकल्पना मांडली आहे. त्या अनुषंगाने कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानास प्रोत्साहन दिले जात आहे. उत्पादन वाढीसाठी ही एक स्तुत्य संकल्पना आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून 10 हजार एकरांवरील ऊस क्षेत्रावर ड्रोनची फवारणी केली जात आहे. हा देशातील पहिला अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी हा सर्वात जास्त श्रम करतो. पण त्याला श्रमाचे मूल्य मिळत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या मालाचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे, तरच प्रगती शक्य आहे. ऊसाचे घटत जाणारे क्षेत्र व उत्पादकता यावर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले, आज ऊस शेती समोर विविध समस्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांनी सामूहिक ऊस शेतीचा अंगीकार केला पाहिजे. या शेतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
अनिता माळगे यांनी, ग्रामीण महिलांसाठी रोजगाराच्या संधी, शासनाच्या योजना आणि यशस्विनी अ‍ॅग्रो प्रोड्यूसरची यशस्विता यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा हा ऊसासाठी प्रसिद्ध आहे. ऊसाची मूल्यवर्धित साखळी उभी राहिल्यास  शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास वाव आहे. त्यासाठी शेतमालाची साखळी तयार करण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होणे गरजेचे आहे.  शासनाने कृषी तंत्रज्ञानाला चालना प्रत्येक जिल्ह्यात ड्रोन फवारणी केंद्राची उभारणी करावी, असे आवाहन केले.
सौ. वैशाली आवाडे यांनी, आज जगभर शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे नवशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये उतरून विविध कृषी प्रयोग हाती घ्यावेत, त्यासाठी  इस्त्रायलची आधुनिक शेती व हिवरेबाजार या आदर्श गावाचे अनुकरण करावे, असेही सांगितले.
आदिनाथ पाटील यांनी प्रास्ताविकात कृषी विवेकच्या आयामाची ओळख करून दिली. कृषी उद्योजकता, केंद्र व राज्य शासनाचे कृषी धोरण, योजना, नवे तंत्रज्ञान, बाजारपेठांची शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विवेक कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विवेकचे कार्यकारी संपादक विकास पांढरे यांनी, कोल्हापूर कृषी उद्योग विशेष पुरवणीचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन विवेक समूहाचे मुंबई मंत्रालय प्रतिनिधी कृष्णात कदम यांनी तर आभार प्रदर्शन जय किसान सोसायटीचे चेअरमन भाऊसो पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय किसान सोसायटीचे व्हाइस चेअरमन बाबासो पाटील, सा.विवेकचे (पश्‍चिम महाराष्ट्र) वर्गणी प्रतिनिधी संजय शिवगण, कृषी विवेकचे कोल्हापूर समन्वयक अभिषेक प्रभुदेसाई, भगवान काटे, विवेकचे इचलकरंजी प्रतिनिधी प्रशांत कुलकर्णी, माधव कुंभोजकर, राजेंद्र अलोणे यांनी परिश्रम घेतले.
सहा यशस्वी शेतकर्‍यांचा झाला गौरव
कोल्हापूरच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या सहा यशस्वी शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पकुंडी देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मनीषा सुनील पाटील,दानोळी  (दूध व फळबाग), संजय बापूसो पाटील, चंदूर (उसाचे एकरी 120टन उत्पादन), यशवंत शिवा पुजारी,चंदूर (मेंढी पालक, भात व मिरची), स्वागत रघुनाथ जाधव, चंदूर (सलग पाच वर्षे ऊसाचे120टन विक्रमी उत्पादन), बापूसो पिरगोंडा पाटील, इचलकरंजी ( ऊस व विविध पीक), राजेंद्र धनपाल केटकाळे,कबनूर (उच्चशिक्षित ऊस उत्पादक शेतकरी) यांचा समावेश होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×