इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:२९:जुलै:इचलकरंजीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी प्रश्नावर कोल्हापूर शहराला एक आणि इचलकरंजीला एक अशी वागणुक अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे कागलच्या पुढार्यांनी इचलकरंजीकरांची तहाण भागवण्यासाठी फेर विचार करावा, अशी प्रतिक्रीया माजी नगराध्यक्षा अलाका अशोक स्वामी यांनी दिली.
इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जात असला तरी शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन दानोळी उद्भव वारणा योजना मंजुर झाली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून ही योजना मंजुर झाली असली तरी त्याला वारणा काठच्या गावांनी विरोध केला. राजकारणातून विरोध वाढत गेला आणि योजना बारगळली, हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे सुळकुड उद्भव दुधगंगा योजना राबवण्याचा निर्णय झाला. त्याला शासनाने मंजुरी दिली असली तरी या योजनेलाही दुधगंगा नदीकाठच्या गावांचा विरोध सुरुच आहे. विशेष म्हणजे कागलच्या पुढार्यांचाही या योजनेला विरोध आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही कागलचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी सुळकुड योजनेला विरोध दर्शवला. त्यामुळे कोल्हापूरला थेट काळम्मावाडी धरणातून पाणी योजना राबवण्यात आली तेंव्हा या योजनेला कोणी विरोध केला नाही. मात्र इचलकरंजीच्या दुधगंगा उद्भव सुळकुड योजनेला कागलचे पुढारी का विरोध करत आहेत ? असा सवाल उपस्थित होत आहे. यातून पुढार्यांचा दुजाभाव स्पष्ट होत असून हा विरोध अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे इचलकरंजीकरांतून संतप्त भावना व्यक्त होत असून कागलच्या पुढार्यांनी इचलकरंजीच्या पाणी योजनेचा फेर विचार करून शहराची तहाण भागवण्याची मागणी होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.