आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीतील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी ५९ लाखांचा निधी मंजूर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि :२५ फेब्रुवारी: इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शासनाने ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या या निधीतून आरोग्य केंद्रांचे रूप पालटणार आहे.
कामगार व झोपडपट्टीवासीयांसाठी महत्त्वाचा निर्णय
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून, येथे देशभरातील विविध राज्यांतील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाली आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कामगार व झोपडपट्टीवासीयांची संख्या आहे. या नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
नुतनीकरणासाठी मंजूर झालेली केंद्रे:
1. लालबहादूर शास्त्री शाळा क्र. ३४, कलानगर
2. भारत माता विद्या मंदिर शाळा क्र. ३३, शाहू पुतळा
3. हुतात्मा भगतसिंग शाळा क्र. २२, विक्रमनगर
4. झाकीर हुसेन उर्दू शाळा, खंजिरे मळा
5. वेणुताई विद्या मंदिर हॉल, आंबेडकर नगर
6. म्युन्सिपल हॉल, जवाहरनगर पोस्ट ऑफिस जवळ
ही प्राथमिक आरोग्य केंद्रे संबंधित भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि तातडीच्या सेवा पुरवतात. मात्र, या केंद्रांच्या इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याने त्यांचे नूतनीकरण आवश्यक होते.
आमदार राहुल आवाडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी राज्य शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून या केंद्रांच्या नूतनीकरणाची गरज अधोरेखित केली. इचलकरंजी औद्योगिक शहर असल्याने येथे आरोग्य समस्या आणि लहानमोठे अपघात वारंवार घडतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था सुधारण्याची निकड असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे मुख्य उद्दिष्ट
या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे नूतनीकरण करून त्या अत्याधुनिक आणि सुसज्ज केल्या जाणार आहेत. परिणामी, इचलकरंजीकरांना अधिक चांगल्या आणि जलद आरोग्यसेवा उपलब्ध होतील.
“शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, हे आमचे प्राधान्य आहे. मंजूर निधीचा योग्य वापर करून लवकरच आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण करण्यात येईल,” असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.