अन्न-औषध च्या नावावर लखोबा कडून गंडा

सांगली:प्रतिनिधी

दि:२४:डिसेंबर: मी अन्न-औषध निरीक्षक अमुक-अमुक यांचा सहायक आहे. तुम्ही तातडीने दुकानाचा, हॉटेलचा परवाना नूतनीकरण करून घ्या. मला ऑनलाइन पैसे पाठवा, तासाभरात कागद पाठवतो,’ असे सांगून एक ‘लखोबा’ सध्या व्यापाऱ्यांना लुटत आहे. ‘गाडी आलीय, छापा पडणार आहे, दुकाने बंद करा,’ असा खोटा संदेश पाठवून दहशत माजवणारे कारस्थानही करीत आहे. त्याच्या या कारनाम्यांना अन्न व औषध विभागाचे अधिकारी वैतागलेत.

मिरज तालुक्यात या लखोबाने फसवणुकीचे दुकान थाटले आहे. तो निव्वळ थापाड्या आहे. एका महिला निरीक्षकाचा सहायक असल्याचे तो सांगतो. वास्तविक, तो जे नाव घेतो, त्या महिला कर्मचाऱ्याची आधीच बदली झाली आहे आणि त्या महिला या स्वतःच सहायक पदावर होत्या. या लखोबाकडे विविध हॉटेल आणि दुकानांच्या परवान्यांची सविस्तर माहिती आहे. त्या जोरावर तो ब्लॅकमेल करतो. ‘परवाना नूतनीकरण आजच केले नाही तर छापा पडेल,’ अशी भीती तो दाखवतो.

अठरा महिन्यांचा परवाना, कायमस्वरुपी परवाना अशा योजना सांगतो. त्या सगळ्या फसव्या आहेत. त्याला कोणत्याही स्वरुपात कुणी पैसे देऊ नये, असे आवाहन अन्न-औषध प्रशासनाने केले आहे. या महाभागाने गेल्या महिनाभरात व्यापाऱ्यांत दहशत माजवली आहे. ‘अन्न-औषध विभागाची गाडी निघाली आहे, ती तुमच्या गावात येतेय, छापा पडेल,’ अशी हूल उठवतो. व्यापारी घाबरतात. दुकाने पटापट बंद करतात. ती का बंद करायची, याबद्दल कुणाला माहिती नाही. दुकान, हॉटेल चालवतोय की काळाबाजार, अशी शंका व्यापाऱ्यांना स्वतःलाच येऊ लागली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. या ‘लखोबा’चा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावावा, अशी मागणी आहे.

आम्हीही वैतागलोय

अन्न-औषध विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या लखोबाला आमचा विभाग वैतागला आहे. तो अशा भानगडी करतोय, त्याची माहिती मिळते, मात्र अधिकृत तक्रार आलेली नाही. व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे कसलेही पैसे भरू नयेत, त्याच्या माहितीवर विश्‍वास ठेवू नये.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×