घोडावत विद्यापीठात परदेशी शिक्षण सेवा कार्यालयाचे उद्घाटन

जयसिंगपूर:प्रतिनिधि

दि:०१: जुलै:पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी संजय घोडावत विद्यापीठात परदेशी शिक्षण सेवा कार्यालयाचे (ग्लोबल ऑफिस) उद्घाटन विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील,ग्लोबल एंगेजमेंटचे संचालक डॉ.के एन तिवारी यांच्या हस्ते झाले. 

परदेशी शिक्षणाचे ध्येय ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना व तेथील अभ्यासक्रमांचा फायदा घेण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू पाटील यांनी दिली.ते पुढे म्हणाले, विद्यापीठाने विद्यार्थी देवाणघेवाण योजने अंतर्गत (आर्टिक्युलेशन प्रोग्राम) सॅन होस स्टेट युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया, यूएसए.टीसाइड युनिव्हर्सिटी, यूके, स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. आर्टिक्युलेशन प्रोग्राममध्ये, विद्यार्थी काही सेमेस्टर घोडावत विद्यापीठात आणि उर्वरित सेमेस्टर भागीदार परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि खर्चाची बचत होईल.

ग्लोबल एंगेजमेंट संचालक डॉ. तिवारी यावेळी म्हणाले की, विद्यापीठाने ग्लोबल इमर्शन प्रोग्रॅम सुरू केला आहे. या अंतर्गत विद्यमान विद्यार्थी 2-4 आठवड्यांसाठी शैक्षणिक दौऱ्यासाठी परदेशी विद्यापीठात जाऊ शकतात. अलीकडेच एप्रिल महिन्यात बीबीए आणि बी.टेक विद्यार्थ्यांनी मेलबर्नला भेट दिली. तेथील व्हिक्टोयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि मोनाश युनिव्हर्सिटी येथे 2 आठवडे प्रशिक्षण घेतले. एस जी यू ग्लोबल विविध परदेशी विद्यापीठांसह संशोधन सहयोग आणि विद्याशाखा देवाणघेवाण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या वर्षात एरोस्पेस इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आर्टिक्युलेशन प्रोग्राम अंतर्गत यूएसएला जाण्याचा विचार करत आहेत.

याप्रसंगी कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,परीक्षा नियंत्रक डॉ.एन के पाटील, ग्लोबल एंगेजमेंट ऑफिसर अमृता हंडूर,असोसिएट डीन प्रा. एस.एम.इंगळे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यासाठी विद्यापीठाचे संस्थापक संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×