पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची वेळोवेळी तपासणी करा

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली:प्रतिनिधी 

 दि. २४  : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याची ठोस अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, विधी समुपदेशक नंदिनी गायकवाड, यांच्यासह वैद्यकीय अधिकारी,‍ विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आरोग्य विभागाने खाजगी तसेच शासकीय सोनोग्राफी सेंटरची तपासणी करावी. अन्न व औषध प्रशासनानेही औषधांबाबतची तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दाखल न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती सादरीकरणातून दिली. तसेच पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनाबाबत http://amchimulgimaha.in व 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करता येत असल्याबाबतची माहिती दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×