कडवई विभाग शिवसेना (उबाठा गट) व युवासेना आयोजित मखर सजावट स्पर्धेत पाटगावच्या गणेश साळवी यांच्या देखाव्याला प्रथम क्रमांक
**कडवई**:
कडवई विभाग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व युवासेना यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त तालुकास्तरीय भव्य मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाटगाव येथील गणेश साळवी यांनी ‘लेक वाचवा’ या सामाजिक विषयावरील देखाव्यासाठी प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक कुचांबे येथील सुमित थेराडे यांच्या ‘पंढरपूर दर्शन’ या देखाव्यास मिळाला, तर तृतीय क्रमांक संगमेश्वर येथील अभिषेक खातू यांनी साकारलेल्या ‘केसरी वाडा’ प्रतिकृतीसाठी प्राप्त झाला. चतुर्थ क्रमांक धामापूर येथील रोशन रामाणे यांच्या ‘रामसेतू’ या देखाव्यास मिळाला, आणि उत्तेजनार्थ पुरस्कार रांगव येथील जगदीश धामणस्कर यांच्या ‘कोकण रेल्वे’ या देखाव्यास मिळाला.
ही स्पर्धा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजिंक्य ब्रीद, संकेत थेराडे, सागर भोजने, चेतन उजगावकर, महेंद्र मादगे, उल्हास घाणेकर, आणि कौस्तुभ मयेकर यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येईल, अशी माहिती युवासेना अध्यक्ष अजिंक्य ब्रीद यांनी दिली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.