तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस निलंबित

पुणे:प्रतिनिधी

दि:२९:जुन:शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरुणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे या तरुणाने या मुलीला वाचवलं. त्यातच आता पुण्यात दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने पुणे पोलिसांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी तीन पोलिसांना निलंबित केले आहे.

पुण्यात सदाशिव पेठेसारख्या गजबजलेल्या ठिकाणी एका तरुणीवर दिवसाढवळ्या हल्ला झाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर पुण्यात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नवीन 25 दामिनी पथके तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर पोलिसांचाा वॉच राहणार आहे.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दामिनी पथकांसह आणखी 100 बीट मार्शल पुणे शहरात गस्त घालणार आहेत. आधी पुण्यात 100 बीट मार्शल होते आता एकूण 200 बीट मार्शल शहरात गस्त घालणार आहेत. पुण्यातल्या सर्वच पोलीस चौक्या आता 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे. दरम्यान, दामिनी पथके, बीट मार्शलसह, समुपदेशनाचे कार्यक्रमही पोलिसांकडून हाती घेण्यात येणार आहेत.

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात काही दिवसांपूर्वीच एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या करण्यात आली. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पुण्यातल्या सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर युवकाकडून हल्ला करण्याचा प्रकार घडला. पुण्यात एकापाठोपाठ अशा घटना समोर आल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवलर आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×