विषबाधेमुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेऊन केली विचारपूस

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी 
दि .५ : शिवनाकवाडी येथे झालेल्या विषबाधेमुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनास योग्य त्या सूचना देताना त्यांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत झाल्या प्रकाराची माहिती दिली.
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे जवळपास ८०० जणांना  विषबाधा झाल्याची घटना घडली. यापैकी जवळपास १०० पेक्षा अधिक रुग्ण इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनानेही यंत्रणा गतिमान करत उपचार सुरु केले. या घटनेची माहिती समजल्यनंतर आमदार राहुल आवाडे यांनी  तातडीने रुग्णालयास भेट देऊन माहिती घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना करताना उपचारात कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी घेण्यास सांगितले.


यावेळी आमदार आवाडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे  आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची माहिती देत आवश्यक ती वैद्यकीय यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी केली. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी जे जे उपचार आवश्यक आहेत ते तातडीने करण्यासह आवश्यक औषधांची तात्काळ मागणी करावी त्याची उपलब्धता करुन देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित सोहनी यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचारक यांच्यासह कपिल शेटके, विजय पाटील उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
03:21