औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई

राधाकृष्ण विखे पाटलांनी ठणकावलं…

अहमदनगर:प्रतिनिधि

दि:०९:जून:

 अहमदगरमधील मुकूंदनगर परिसरात संदल मिरवणुकीत औरंगजेबाची पोस्टर झळकल्याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच कडाडले आहेत. औरंगजेबाचे फोटो घेऊन औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करणार असल्याचं विखे पाटलांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालात आयोजित पत्रकार परिषेदत राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाचणाऱ्यांनी इथं थारा नाही. त्यांच्याबद्दल कोणीही सहानुभूती दाखवणार नसून या प्रकरणी शासन स्तरावर जी कारवाई असेल ती होणार आहे. वेळ पडल्यास त्यांच्यावर मोक्काची कारवाई करणार असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच अहमदनगरसह इतर भागांतील दंगल प्रकरणावरही त्यांनी सडेतोडपणे भाष्य केलं आहे. दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. या प्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिले असून चौकशीनंतर सर्व काही उघड होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

दरम्यान, शहरातील मुकूंदनगर भागात हजरत दम्मा हरी दर्ग्यात सालाबादाप्रमाणे उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही तरुण हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. मिरवणुकीदरम्यान, शक्ती प्रदर्शन करुन “बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है” अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

औरंगजेबाची प्रतिमा घेऊन नाचत असल्याचा तरुणांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. राज्य सरकारने दखल घेताच मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या चार तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, औरंगजेबाचे पोस्टर अहमदनगरमध्ये झळकल्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली होती. संगमनेरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही सोशल मीडियावर औरंगजेबाच्या समर्थानात पोस्ट झळकल्याने संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांना मोर्चा काढला. या मोर्चालाही गालबोट लागल्याचा प्रकार घडला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
20:59