पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा

पंढरपूर:प्रतिनिधी

दि:२९:जुन:आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करुन पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. दरम्यान, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी म्हणून नगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. 

या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन  कामगार मंत्री सुरेश खाडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विशेष म्हणजे आज प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या मानाचे वारकरी दांपत्याच्या हस्ते परंपरेनुसार पूजा करण्यात आली. दरम्यान महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारी ही दुसरी शासकीय महापूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांना विठ्ठल-रूक्मिणीच्या महापुजेचा मान मिळाला आहे. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे, यासाठी ते सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहिले होते. गेल्या तीस वर्षांपासून कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता त्यांनी जोडीने वारी केली असल्याचे सांगण्यात आले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×