प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न साकार – आमदार राहुल आवाडे
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २५ फेब्रुवारी: प्रत्येक गोरगरीब बेघर कुटुंबाचे हक्काचे घर असावे, हे त्यांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे मत आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. या योजनेअंतर्गत मंजूर घरकुले शंभर दिवसांत पूर्ण करावी, तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हातकणंगले तालुक्यातील चंदुर येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदुर, कबनूर, तारदाळ, खोतवाडी आणि कोरोची गावातील ३७८ पैकी ३५२ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि डीबीटीद्वारे पहिल्या हप्त्याचे वितरण आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. हातकणंगले पंचायत समिती आणि पाच गावांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
१० हजार रुपये वैयक्तिक मदतीची घोषणा
घरकुल पूर्णत्वास गेल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने वैयक्तिकरित्या १० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. राज्यात एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अशी मदत देण्याची ही पहिलीच घटना आहे.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी माजी सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच योगिता हळदे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी रामन्ना, सहाय्यक गटविकास अधिकारी यू. के. महाले, श्रीमती शालन पाटील, धुळाप्पा पुजारी, तसेच पाच गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
५० हजार रुपयांची वाढ – घरकुलसाठी २.१० लाख निधी
गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी सांगितले की, शासनाने घरकुल योजनेसाठी पूर्वीपेक्षा ५० हजार रुपयांची वाढ केली असून, आता प्रत्येक घरकुलासाठी २ लाख १० हजार रुपये निधी उपलब्ध होणार आहे. घरकुलांचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन आणि आभार
सूत्रसंचालन सचिन हळदे आणि संजय जिंदे यांनी केले, तर आभार संदीप कांबळे यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.