प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान

 

संगमेश्वर: शिक्षक पर्यटन व पर्यावरण विकास संस्था आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी खेड येथे एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 

या कार्यक्रमात खेडचे नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, गटशिक्षणाधिकारी श्री. बाईंग, आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय काशीद यांच्या प्रमुख उपस्थिती होती. सौ. मणेर यांनी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा संगमेश्वर या विद्यालयात तीन दशकांहून अधिक काळ अध्यापनाचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी विविध नवनवीन उपक्रम राबवले आहेत.

 

सौ. मणेर यांनी 1 जानेवारी 2023 रोजी मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शाळेच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या राज्य शासनाच्या उपक्रमात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवता आला. क्रीडा आणि विविध स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.

 

या पुरस्कारामुळे सौ. मणेर यांच्या नेतृत्वाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, मराठी माध्यम चेअरमन श्री. नियाज कापडी, इंग्रजी माध्यम चेअरमन श्री. इब्राहीम काझी तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेने गुणवत्तेच्या बाबतीत उच्च स्थान मिळवले आहे.

 

सौ. मणेर यांच्या नेतृत्वात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि व्यक्तिमत्त्व विकासात झाला आहे. या यशस्वी वाटचालीबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांचे सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×