जिल्हा माहिती कार्यालयाच्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन,विद्यार्थी आणि माध्यमांसाठी उपयुक्त संदर्भ साधन-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह 

 

रत्नागिरी, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली निवडणूक पूर्वपीठिका राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच माध्यमांतील पत्रकारांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवोद्गार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी काढले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीच्या या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार, एमसीएमसी सदस्य पत्रकार मुश्ताक खान, आकाशवाणीचे योगीराज बच्चे, कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेंद्र बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचीन देसाई उपस्थित होते.

निवडणूक पूर्वपीठिकेतील माहितीचे ठळक मुद्दे

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या निवडणूक पूर्वपीठिकेत 1962 ते 2019 या कालावधीतील विधानसभा निवडणुकांचे माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम, विधानसभा मतदारनिहाय अंतिम मतदारांची आकडेवारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त समित्यांची माहिती, नियंत्रण कक्ष क्रमांक, निवडणूक आचारसंहिता, काय करावे-काय करू नये, प्रचार संबंधित सूचना, पेड न्यूज आणि समाज माध्यम वापरासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचा समावेश आहे.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी संपादित केलेल्या या पूर्वपीठिकेस जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, आणि कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळ्ये यांची प्रेरणा तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×