विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार
विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार
रत्नागिरी, दि.16:- सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना पुरस्कार प्रदान करुन काल मुंबईत सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुध्द पध्दतीने नोंद करुन, त्याआधारे तयार करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे काल मुंबईत प्रकाशन सोहळा झाला. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन आधारावर 54 निर्देशांकाची माहिती येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे मागविण्यात आली होती. त्यामध्ये विशेषत: एक हजार व्यक्तींमध्ये जिल्ह्यात असणाऱ्या रस्त्यांची लांबी, पक्क्या घरांची संख्या, बँकांची संख्या याबाबतचे निकष होते. या माहितीच्या आधारावर पुण्यातील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. यात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी पुरस्कारानंतर प्रतिक्रीया व्यक्त केली. लोकसत्ता सारख्या प्रतिष्ठित, द इंडियन एक्स्प्रेस समुहाकडून मिळालेला हा सन्मान, जिल्ह्य़ात कार्यरत असलेल्या आपल्या सर्वांसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे. रत्नागिरी हा जिल्हा पुरस्कार मिळविणाऱ्या आठ जिल्ह्यांपैकी एक आहे आणि आपण विकास निर्देशांकात राज्यात प्रथम क्रमांकावर आलो आहोत.
उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांनी रत्नागिरीचे कौतुक केल्याबद्दल आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
पालकमंत्री महोदय उदय सामंत यांनी गेल्या एक वर्षात सातत्याने मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करुन श्री. सिंह म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाशिवाय राज्यस्तरावर अव्वल स्थानावर उभे राहणे शक्य नव्हते. मला खात्री आहे की पुढील वर्षी या निर्देशांकांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या धोरणात आणखी प्रगती करू. रत्नागिरी जिल्ह्य़ातील विकासाचे निर्देशांक सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या आणि रत्नागिरी जिल्ह्य़ात सातत्याने काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.