एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नियुक्तीचे समाधान – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी:नियाझ खान
दि.२६ : एमआयडीसी मधील कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या 216 कर्मचाऱ्यांना महामंडळात कायमस्वरुपी नियुक्ती पत्र देत आहे. एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांना न्याय देऊ शकलो, याचं मला समाधान आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात एमआयडीसीमधील कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात आली.यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, महाव्यवस्थापक मनुष्यबळ विकासचे तुषार मठकर, अधिक्षक अभियंता कालिदास बनसोडे एमआयडीसी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री सामंत म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये कायम करता आले नाही, त्यांचे अर्थिक नुकसान होऊ देणार नाही. संघटनेने मागणी केलेल्या भत्त्यापेक्षा जास्त भत्ता देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या बुटासाठी 1200 रुपये मंजूर केले आहेत. तुम्ही जर आंनदी असाल तर, चांगले काम करु शकता. एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना आपण पैसे दिले. एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या मुलांना आपण परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृती योजना चालू करणार आहोत.
एमआयडीसी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपण मेडिकल पॉलिसी मंजूर करणार आहोत. सर्व कर्मचारी सुखी असले पाहिजेत. सर्वांची प्रगती झाली पाहिजे. एमआयडीसी कर्मचाऱ्यांना सर्व चांगल्या सुख सोयी दिल्या जातील. आशिया खंडातील एमआयडीसी हे सर्वात मोठे महामंडळ आहे. आपल्यासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. चांगले काम करा अशी अपेक्षा मी करत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे नाव झाले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी उदय सामंत फौंडेशनच्या मार्फत पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मठकर यांनी तर, आभार प्रदर्शन श्री. चव्हाण यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.